महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१ अ अ मधील तरतुदी व त्यानुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या आदेशानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता धर्मादाय रुग्णालय मदत योजना तयार करण्यात आली आहे.
त्यानुसार, “प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १०% खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १०% खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक आहे.”
सदर धर्मादाय रुग्ण योजना :-
निर्धन : ज्या रुग्णाचे तहसीलदार प्रमाणित एकूण वार्षिक उत्पन्न हे रु.१,८०,०००/-रुपयांपेक्षा अधिक नसेल या घटकांतील रुग्णांकरिता योजना उपलब्ध आहे.
दुर्बल : ज्या रुग्णाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रु.३,६०,०००/- रुपयांपेक्षा अधिक नसेल या घटकांतील रुग्णांकरिता योजना उपलब्ध आहे.
महत्त्वाचे : निर्धन व दुर्बल घटकांकरीता पात्र रुग्णांची उत्पन्न मर्यादा ही शासनाने वेळोवेळी निर्धारीत केल्याप्रमाणे असेल.
योजने संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न :-
१. सदर योजनांतर्गत कोणत्या आजारांचा
समावेश होतो?
> नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांमध्ये ज्या ज्या आजारांवर उपचार
होतो, त्या- त्या सर्व आजारांचा या योजनेत समावेश होतो.
२. सदरहू योजनांतर्गत उपचाराच्या रकमेची
मर्यादा काय आहे ?
> सदर योजनेमध्ये उपचारासाठी रकमेची मर्यादा निश्चित नाही. तथापि, निर्धन
रुग्णांकरिता उपचार मोफत आहेत आणि दुर्बल घटकांतील रुग्णांकरिता विहीत सवलतीच्या
दराने उपचार करण्यात येतात.
३. उपचारादरम्यान आवश्यक औषधे / वस्तू
रुग्णालयात उपलब्ध नसल्यास बाहेरुन विकत आणाव्या लागतील का ?
> नाही
४. धर्मादाय रुग्ण योजनांतर्गत मिळत असलेले उपचार व पैसे भरणाऱ्या रुग्णाचे उपचार अथवा उपचाराचा दर्जा यामध्ये काही फरक आहे का ?
> उपचारांमध्ये अथवा उपचाराच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक असणार नाही.
५.सदर योजनांतर्गत एकदा उपचार घेतल्यास
त्याच रुग्णास दुसऱ्या आजारासाठी योजनांतर्गत उपचार घेता येईल काय ?
> होय, घेता येईल.
६. धर्मादाय रुग्णालया व्यतिरिक्त अन्य
रुग्णालयात उपचार सुरु असल्यास पात्र रुग्णाला उर्वरित उपचारासाठी धर्मादाय
रुग्णालयामध्ये हस्तांतरीत करुन योजने अंतर्गत उपचार मिळू शकणार का ?
> होय,
- सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गृह, विधि व न्याय विभागाच्या दि.३१.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाची स्थापन करण्यात आली आहे.
- धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष हा ७ वा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत आहे.
योजनेचा उद्देश :-
- राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांतील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करुन देणे.
- महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम,१९५० च्या कलम ४१ अअ मधील तरतुदी व त्यानुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र.३१३२ / २००४ मध्ये दिलेल्या न्यायनिर्णयानुसार तयार केलेल्या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करणे.
- धर्मादाय रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेची वस्तुस्थिती, निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना आरोग्य सेवांसाठी योग्य प्रवेश प्रदान करणे.
- धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा रुग्णांना पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी त्यावर केंद्रीकृत पध्दतीने देखरेख ठेवणे व योजनेची प्रभावी अंमलबाजवणी करणे.
- धर्मादाय रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या रुग्णाला योग्य रुग्णसेवा व उपचार मिळत असल्याची खात्री करणे.
१.धर्मादाय आयुक्तालय,महाराष्ट्र शासन
0 Comments