Fort Padmadurg | किल्ले पद्मदुर्ग उर्फ कासा | मुरुड म्हणजे फक्त जंजिरा नव्हे,तर मुरुड-पद्मदुर्ग अशी सुद्धा मुरूडची ओळख !

 
मुरुड म्हणजे फक्त जंजिरा नव्हे,
तर मुरुड-पद्मदुर्ग अशी सुद्धा मुरूडची ओळख !

चला तर मग जाणून घेऊया मुरुड...

किल्ल्याचे भौगोलिक स्थान, Geographical Location Of The Fort :-

किल्ले पद्मदुर्ग अर्थातच कासा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड (पूर्वीचे नाव कुलाबा) जिल्ह्यात असलेल्या जलदुर्ग प्रकारातील एक किल्ला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७५ मध्ये बांधलेला हा किल्ला मुरुड गावाजवळील अरबी समुद्रातील किल्ला आहे. मुरुड हे रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे व पर्यटन ठिकाण आहे.


किल्ल्यावर जाण्याचे मार्गApproaches To The Fort :- 

सर्वप्रथम आपण मुरुडला येण्याचे मार्ग कोणते आहेत हे पाहू.मुरुड हा भाग तसा दुर्गम असल्यामुळे येण्यासाठी बाय रोड हे एकच माध्यम आहे.
१) पहिला मार्ग आहे रोहा-मुरुड (केळघर मार्गे) = ३३ किलोमीटर आहे.
२) दुसरा मार्ग हा इंदापूर-तळा-मुरुड = ५२ किलोमीटरचा आहे.
३) तिसऱ्या मार्गाचा विचार केला तर अलिबाग-मुरुड या मार्गाने सर्वात जास्त लोक मुरुडला येतात कारण या मार्गावर असणारे नागाव बीच,रेवदंडा बीच व किल्ला, बिर्ला मंदिर,काशीद बीच, नांदगावच सुप्रसिद्ध अष्टविनायक मंदिर, नांदगाव वरून जाणारा फणसाड अभयारण्य रस्ता आणि आणि शेवटी मुरुडला पोचता. सदर अलिबाग_मुरुड हा मार्ग = ५० किलोमीटरचा आहे.
मुरुडला पोचल्यावर समुद्रकिनारी किल्ल्यावर जाण्यासाठी १० ते १२ सीटर बोट आपल्याला मिळतात मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून किल्ल्यावर जाण्यासाठी २५ ते ३० मिनिटे लागतात. 

किल्ला पाहण्याची उत्तम वेळBest Time To Visit The Fort :- 

ऑक्टोंबर पासून मे पर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकता समुद्र व हवामानाचा अंदाज पाहून बोटी किल्ल्यात सोडल्या जातात.


या ठिकाणी मला महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते की, मुरुडला भेट देणारे बहुतांशी पर्यटक हे फक्त जंजिरा किल्ला पाहण्यातच धन्यता मानतात परंतु जवळच असणारा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला व जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेला किल्ले पद्मदुर्गकडे वळूनही न पाहता निघून जातात त्यामुळे वाईट वाटते. मुरुडची ओळख फक्त जंजिरा नव्हे तर मुरुड म्हणजे पद्मदुर्ग अशी सुद्धा आहे. त्यामुळे माझं प्रामाणिक मत आहे की मुरुडला येणाऱ्या सर्व पर्यटकांनी पद्मदुर्ग हा किल्ला अवश्य पहावाच. 

मान्य आहे की आज या किल्ल्याची पडझड झालेली आहे व किल्ल्यावर जाण्यासाठी जंजिऱ्याप्रमाणे बोटी उपलब्ध नसतात पण इच्छा शक्ती असेल तर मार्ग हा मिळतोच...फेब्रुवारी २०१८ शासकीय सेवेत असल्यापासून आतापर्यंत ०७ वेळा किल्ल्यावर जाण्याचा योग आला परंतु अजून काही इच्छा पूर्ण होत नाही ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी किल्ल्यावर जातोच आणि जातच राहणार कारण हे एक मुरुड मधील स्फूर्तीदायक ठिकाणं आहे असं मला वाटत.

किल्ल्याच्या ठिकाणी मुख्य किल्ला व पडझडी चा भाग असे दोन भाग आपणास पाहावयास मिळतात.


किल्ल्यावर पडकोटात असणारे कोटेश्वरी मातेचे मंदिर हे मुरुड गावकऱ्यांचे कोटेश्वरी देवी मुळ ठिकाण आहे असे मानले जाते. 


त्यामुळे किल्ल्याच्या ठिकाणी मुरुडकरांच्या वतीने दरवर्षी पद्मदुर्ग जागर चे आयोजन केले जाते जागर/यात्रेला स्थानिकांची खूप मोठी गर्दी आपणास पाहावयास मिळते...(पद्मदुर्ग जागर 2018 ची काही क्षणचित्रे)


किल्ल्याचा इतिहास
History Of The Fort :-

जंजिऱ्याच्या सिद्धीच्या वाढत्या अत्याचाराला लगाम घालण्यासाठी तसेच समुद्रमार्गातून होणारा व्यापार व शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडच्या समुद्रात कासवाच्या आकारासारखे असणाऱ्या बेटावर दर्यासारंग आणि दौलत खान यांना हाताशी घेऊन किल्ला बांधला म्हणूनच या किल्ल्याला कासा किल्ला असे म्हटले जाते तर पद्मदुर्ग म्हणजे किल्ल्यावर असणारे बुरुजाची कमान ही कमळाच्या पाकळ्यांसारखी असल्याने त्यास पद्मदुर्ग हे नाव देण्यात आले असावे.किल्ल्याबद्दल महाराजांनी गौरव उद्गार काढताना म्हटले आहे की,

"पद्मदुर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिऱ्याच्या) उरावर दुसरी राजापुरी उभी केली आहे"

एबेसिया (आताचे नाव Ethiopia) मधून आलेले लोक राजापुरीच्या जवळ असलेल्या किल्ल्यावर राहत होते ते लोक म्हणजेच सिद्धी होय. हे लोक किनारपट्टीच्या जवळ असणाऱ्या लोकांचा छळ करत असत,त्यांच्यावर अत्याचार करत असत ज्या प्रमाणे घरात उंदीर त्याप्रमाणे स्वराज्यात सिद्धी उंदीर हा घरात असतो त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत असते परंतु आपल्याला काही मारता येत नाही तसे सिद्धीचे काहीसे होते.

पद्मदुर्ग किल्ल्यावर असणारा बहादूर शिलेदार ज्याचे नाव होते लाय पाटील मोरोपंतांना जंजिरा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी सहाय्य केले त्यामध्ये किल्ल्याच्या मागील बाजूस शिड्या लावण्याचे धाडस त्यांनी केले होते. जंजिऱ्याची अभेद्य सुरक्षा व्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम त्यांनी केले परंतू लाय पाटील व मोरोपंतांची वेळ जुळून न आल्यामुळे सदरचा प्रयत्न फसला...लाय पाटील यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला होता परंतु त्यांनी तो नम्रपणे नाकारला. यावरून महाराजांच्या काय ते लक्षात आले आणि त्यांनी मोरोपंतांना एक नवीन गलबत बांधून त्याचे नाव पालखी ठेवून ते लाय पाटील यांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. त्याच बरोबर महाराजांनी त्यांना छत्री,वस्त्रे,निशान व दर्याकिनारची सरपाटीलकी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी सिद्धीचा जंजिरा  स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी सिद्धी आणि मराठये सैनिक यांच्यात अनेक लढाया पद्मदुर्ग किल्ल्यांनी पाहिल्या...
(स्वराज्याच्या रक्षणासाठी नाईलाजास्तव महाराजांना रायगडाकडे परत फिरावे लागले...) 
छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर (१६८९) हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता असा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आढळतो त्यांच्यानंतर हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला, पेशवे काळात मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला असे म्हटले जाते परंतु त्याविषयी माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात होता, १९ व्या शतकात या किल्ल्याचा वापर राजकीय कैद्यांना कैद करण्यासाठी केला जात होता.
महाराजांचे अपुरे राहिलेले स्वप्न अखेर ३१ जानेवारी १९४८ रोजी साकार होऊन मुरुड संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.

किल्ल्याची भौगोलिक रचना, Geographical Structure Of The Fort :-

किल्ल्याच्या भौगोलिक रचनेचा विचार करता किल्ल्याचे मुख्य दोन भाग पडतात हे आपण अगोदर पाहिलेच आहे यातील...
१) पडकोट
२) मुख्य किल्ला


१) पडकोट :-

पडकोटाच्या या भिंती समुद्राच्या लाटा, सोसाट्याच वारा यामुळे पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पण त्या काळात वापरण्यात आलेल्या चुन्यामुळे या भिंती काहीशातग तग धरून आहेत. राज्य शासनाच्या वतीने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा,स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे पण,खरंतर हेच गड किल्ल्यांचे वैभव जतन करून ठेवले पाहिजे खरी स्मारके हीच आहेत परंतु या
गड किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष झालेले आहे. 

या ठिकाणी आणखी एक अभिमानास्पद,विशेष बाब उल्लेख करावीशी वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची झालेली दुरवस्था याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेक्रेड हार्ट स्कूल कल्याण चे १४ विद्यार्थी यांनी ८ किलोमीटरचे अंतर पोहून पार केले व महाराजांना मानवंदना दिली या मोहिमेला साथ दिली ती मुरुड-जंजिरा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष,कार्यतप्तर मुख्याधिकारी श्री.पंकज भुसे सर यांनी जंजिरा ते पद्मदुर्ग किल्ला हे ८ किलोमीटरचे अंतर १४ विद्यार्थ्यांसोबत पोहून पार करून त्यांनी एक नवा आदर्शच याद्वारे निर्माण केला.

(दैनिक लोकसत्ता बातमी दि.२० फेब्रुवारी २०२३)

(पडकोटावरील संग्रहित छायाचित्रे)
पडकोटा मधील सर्वांचेच आकर्षक मानबिंदू म्हणजे भारतातील सर्वात मोठा परम,प्रवित्र व स्फूर्तीदायक भगवा ध्वज...किल्ले जंजिरावर भगवा ध्वज फडकवण्याचा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठान यांनी केला होता परंतु त्यास विरोध झाल्याने प्रत्युत्तर म्हणून पद्मदुर्गवर भगवा ध्वज फडकवण्यात आला...याबाबत सह्याद्री प्रतिष्ठान यांचे मानावे तितके आभार कमीच आहे.
 

किल्ल्यातील पडकोटात आपणास कोटेश्वरी देवीचे मंदिर, इतरत्र पडलेल्या तोफा, चौकोनी विहीर व इमारतींचे अवशेष दिसून येतात.

२) मुख्य किल्ला :-

सहा बुरुजांची भक्कम तटबंदी असलेला भाग म्हणजे मुख्य किल्ला...समुद्र व पडकोटातून दिसणारा तसेच बोटीतून उतरल्यानंतर जो उजवीकडील भाग आहे तो आजही मजबूत स्थितीत उभा आहे.किल्ल्यामध्ये १०० च्या आसपास तोफा होत्या असं बोलले जाते परंतु सध्या ४० तोफा असून त्यातील बहुतेक तोफा ह्या गंजलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे त्यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे...याबाबत सह्याद्री प्रतिष्ठान याचं काम उल्लेखनीय व तितकच प्रेरणादायी अस आहे.

पद्मदुर्गाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चार-पाच पायऱ्या चढून आत जावे लागते किल्ल्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्यात प्रवेश करताचं जाहीर सूचनांचा फलक पुरातत्त्व खात्याकडून लावण्यात आलेला आहे सर्व नागरिकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.


किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याच्या चार टाक्या आहेत, आजूबाजूच पडलेलं बांधकाम,
तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचे ०४ मार्ग असून तटावरून मुरुडचा समुद्रकिनारा,जंजिरा किल्ला यांचे सुंदर दर्शन आपणास घडते.


समुद्राकडील भागाची बऱ्यापैकी जीज झालेली असून त्यात तटबंदीसाठी वापरण्यात आलेल्या दगडांची झीज मोठ्या प्रमाणावर झालेली आहे मात्र त्यासाठी  वापरण्यात आलेला चुनखडक (चुना) मात्र आहे तसाच आहे.


किल्ल्याचा महादरवाजा आजही तितकाच आकर्षक आणि सुस्थितीत असलेला आपणास पहावयास मिळतो मात्र समुद्राच्या बाजूकडील असणाऱ्या महादरवाज्याच्या पायऱ्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झालेली आहे. शत्रूला सहजासहजी दिसून येणार नाही अशी महादरवाजाची रचना केलेली आहे. या पद्धतीची रचना आपणाला सर्वच गडकिल्ल्यांवर पहावयास मिळते.महादरवाजातून दिसणारे मुरुडचे विलोभनीय दृश्य व येणारी थंड हवा मनाला मोहून टाकते...


तटबंदीच्या बुरुजावरून दिसणारा जंजिरा किल्ला आणि त्या बुरुजावर असलेली तोफ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.त्यामुळे तेथून छायाचित्र टिपण्याचा मोह काही आवरता आला नाही.


किल्ल्याचे जतन आणि संवर्धन, Preservation And Conservation Of The Fort :- 

राज्य शासनाकडून अनेक गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे परंतु या जलदुर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे असे दिसून येते किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धन मध्ये ज्यांचे नाव कायमच अग्रेसर राहिले ते म्हणजे आमचे प्रेरणास्थान माननीय राज्यसभा माजी खासदार व स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज...यांच्या विशेष प्रयत्नातून जेट्टीचे काम होणार आहे...आशा आहे की, यामुळे किल्ले पद्मदुर्गच्या पर्यटनात वाढ होईल.


दत्त मंदिराच्या टेकडीवरून किल्ले पद्मदुर्गाचं दिसणारे विहंगम दृश्य...


मुरुड-पद्मदुर्ग बीच युट्युब वरील माझा पहिला व्हिडिओ


जीवन कदम यांचा मार्गदर्शक 
YouTube Video


मुरुड मध्ये पाहण्यासारखी आणखी काही ठिकाणे:-

१) जंजिरा किल्ला
२) खोकरी 
३) नवाबाचा वाडा अर्थात अहमदजंग पॅलेस 
४) टेकडीवरील दत्त मंदिर 
५) समुद्र किनारा 
६) मुरुड-रोहा रोडवरील स्वामी समर्थ मंदिर 
७) गारंबी धरण 
८) खार आंबोली धरण 
९) सवतकडा धबधबा 
 




 

Post a Comment

1 Comments

Vitthal Shinde said…
ब्लॉग आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा.